ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - 'भाजपाची औकात काय आणि तुमची औकात काय हे येत्या २१ तारखेला दाखवून देऊ ' अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. भारतीय जनतेच्या पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. आमची शिवसेनेच्या विचारांशी नव्हे तर त्यांच्या आचारांसी लढाई आहे. त्यांचे विचार वेगळे आणि आचार भलतेच असतात. त्यांचा आचार आणि भ्रष्टाचारी कारभार आम्हाला मान्य नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
भाषणादरम्यान बसला मुख्यमंत्र्यांचा आवाज
पारदर्शी कारभारचा दाखला देत शिवेसेनवर जोशात टीकास्त्र सोडणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आवाज अचानक बसला. मात्र त्यावरही ' आज पाणी पितोय, २१ तारखेला पाणी पाजेन' असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला. मात्र आवाजाने जास्त वेळ साथ न दिल्याने त्यांना भाषण आटोपतं घ्यावं लागलं.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे :
- आम्ही मनोरंजन करणारे, जुगलबंदी करणारे लोक नाही. आम्ही नोटाबंदी करणारे, भ्रष्टाचारबंदी करणारे लोक आहोत.
- शिवसेनेच्या हट्टामुळे युती तुटली.
- भाजपाला १२७, शिवसेनेला १४७ आणि इतरांसाठी १८ जागा देण्याचा निर्णय झाला होचा. मात्र शिवसेनेच्या १५१ जागांच्या हट्टामुळेच ही युती तुटली.
- विधानसभेत युती तुटली नसती, तर कधीच मुख्यमंत्री झालो नसतो .
- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतून भाजपची ताकद दिसली, पण तरीही मनपा युतीसाठी माघार घेतली.
- शिवसेनेच्या आचारात आणि विचारात फरक. त्यांचा आचार आणि भ्रष्टाचारी कारभार आम्हाला मान्य नाही.
- युतीसाठी पारदर्शीपणा ही एकच अट ठेवली, पारदर्शीपणा ही माझी चूक आहे का?
- सत्तेत येऊन हाती भगवा घेऊन खंडणी वसुली करणं हे कदापी खपवून घेणार नाही.
- भगवा झेंडा घेऊन हफ्ता वसुली करण्यासाठी जनतेने कौल दिलेला नाही.
- तुम्ही सांगाल तेवढा पारदर्शीपणा राज्य सरकारमध्ये आणायची माझी तयारी आहे.
- प्रश्न जागांचा नव्हता, ५-६ जागा इकडे-तिकडे झाल्या तरी चालतील. पण पारदर्शिकतेच्या मुद्यावर तडजोड करणार नाही.
- भाजपची औकात काय आणि तुमची औकात काय हे आम्ही २१ तारखेला दाखवून देऊ.
- 25 वर्षे महापालिका शिवसेनेच्या हातात दिल्याने मुंबईचं नुकसान झालं.
- आम्हाला गगनचुंबी इमारती नको, आम्हाला गरिबांना घर द्यायचं आहे.
- जनतेला अफूची गोळी देणं बंद केलं पाहिजे. जनेतेन म्हटलं पाहिजे '(तुम्ही) करून दाखवलं.'