मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या ३ महिन्यांत तब्बल १८ किलो वजन घटवले आहे. ते वजन घटवण्यासाठी मेटाबॉलिक उपचार घेत असून, त्यासाठी त्यांना औषधांसोबत योग्य व आवश्यक आहार घ्यावा लागत आहे. पथ्येही पाळावी लागत आहेत. मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरमध्ये डॉक्टरांशी संपर्क साधला होता. पुढे फेब्रुवारीमध्ये उपचारांना सुरुवात केली तेव्हा त्यांचे वजन १२२ किलो होते. मात्र फक्त तीन महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी १८ किलो वजन घटवले असून, आता त्यांचे वजन १0४ किलो आहे. मात्र त्यावर ते समाधानी नाहीत. त्यांना आपले वजन ८८ ते ९0 किलोंवर आणायचे आहे. अशाच प्रकारे मेहनत घेतली तर येत्या तीन महिन्यांत ते आपले लक्ष्य पूर्ण करतील, अशी खात्री डॉक्टरांना वाटत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही वजन कमी केले होते. पण कामाचा व्याप आणि अनियमित वेळापत्रक, जेवणाच्या वेळा पाळल्या न जाणे यामुळे ते पुन्हा वाढू लागले. मात्र त्यांच्या पत्नी अमृता यांनी जेव्हा स्वत:चे वजन ५ ते ६ किलोंनी कमी केले, तेव्हा मुख्यमंत्र्यांनाही स्वत:चे वजन कमी व्हायला हवे, असे पुन्हा वाटू लागले. म्हणजेच अमृता फडणवीस यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली, असे म्हणायला हरकत नाही. मेटाबॉलिक आणि बॅरियाट्रीक सर्जन जयश्री तोडकर सध्या मुख्यमंत्र्यांवर उपचार करत आहेत. मुख्यमंत्री असल्याने फडणवीस यांना खूप प्रवास करावा लागतो. त्यामुळे जेवणाच्या वेळापत्रकात बदल होतो. मात्र तरीही त्यांची हालचाल बऱ्यापैकी आहे. दिवसाला १0 हजारांहून अधिक पावले, ते वेगाने चालतात, अशी माहिती जयश्री तोडकर यांनी दिली.फिटनेस गुरू मिकी मेहता हेही मुख्यमंत्र्यांना व्यायामाचे प्रशिक्षण देत आहेत. आठवड्यातून दोन तास श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. मुख्यमंत्र्यांना दिवसातून फक्त चार ते पाच तास झोप मिळते. श्वासोच्छ्वासाचा व्यायाम केल्याने त्यांच्या झोपेची समस्या सुटण्यास मदत होत आहे. वर्षाअखेरीस मुख्यमंत्र्यांचे वजन पूर्णपणे आटोक्यात येईल, असा विश्वास मिकी मेहता यांनी व्यक्त केला. मिकी मेहता हे अमृता फडणवीस यांनाही प्रशिक्षण देत आहेत.फडणवीस यांना दिवसातून एकदाच चहा पिण्याची परवानगी आहे. मात्र ते बिनसाखरेचा चहा घेण्यावर भर देतात. शाकाहारी जेवणात पनीर तर मांसाहारी जेवणात चिकन, फिशचा आहार असतो. बटर आणि तूप खाण्याची परवानगी आहे; मात्र त्यांचे प्रमाण कमी ठेवले जाते. त्यांना सर्व प्रकारचे पदार्थ खाण्याची परवानगी आहे, मात्र बाहेरचे वा जंक फूड याची परवानगी नाही, असे जयश्री तोडकर म्हणाल्या.‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्या वेळी त्यांनी वजन कमी कसे केले, असा प्रश्न माजी गृहमंत्री जयंत पाटील यांनी त्यांना केला होता. त्यावर आपण यापूर्वी बरेच प्रयत्न केले होते.
मुख्यमंत्र्यांनी ३ महिन्यांत घटवले १८ किलो वजन
By admin | Published: April 19, 2016 4:18 AM