मुंबई : राज्यातील हॉटेल, बार उघडण्यात आले असताना मंदिरं बंद का? असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. तर राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे म्हणत पत्रानेच उत्तर दिले आहे. त्यामुळे राज्यपाल आणि उद्धव ठाकरे यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला ज्या प्रकारे उत्तर पाठवले आहे, ते अतिशय दुर्दैवी आहे, असे भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
जळगावमधील जामनेर येथे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने उभारलेल्या ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्राबाबत आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी राज्यपाल यांच्याकडे जी निवेदने येत असतात. ती निवेदने घेऊन राज्यपाल हे एक पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्या पत्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा असतो. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे राज्यपालांच्या पत्राला उत्तर पाठवले आहे, ते दुर्दैवी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याचबरोबर, हे तीन पक्षाचे सरकार आहे. शिवसेना स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष असल्याचे म्हणतो. पण, त्यांच्या सत्तेच्या काळात मंदिरांवर अन्याय होतो. याबद्दल आश्चर्य वाटते. तसेच, देशभरात मंदिर उघडण्यात आली आहे. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून मंदिरे उघडता येतात. मंदिरांमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला अशी कोणतीही घटना घडली नाही. मंदिराजवळील फुल विक्रेता, नारळ विक्रेता, चहा टपरी चालवणारे बेरोजगार झाले आहे. त्यांना सरकारने कोणतीही मदत दिली नाही, असे सांगत जर मदिरालय सुरू होत असेल तर मंदिरं का सुरू होत नाही, अशी आमची मागणी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का? राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवालराज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. यामध्ये लॉकडाऊन शब्द केराच्या टोपलीत टाकायचा आहे असे तुम्ही म्हटले होते. मात्र तरीही अद्याप राज्यातील प्रार्थनास्थळे उघडलेली नाहीत. एका बाजूला बार, हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र प्रार्थनास्थळे बंदच आहेत. देव अजूनही लॉकडाऊनमध्येच आहेत. अनेक शिष्टमंडळांनी, राजकीय नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी माझ्याकडे प्रार्थनास्थळं सुरू करण्याची मागणी केली आहे, असे राज्यपालांनी पत्रात नमूद केले आहे. याचबरोबर, राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. 'तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अयोध्येला गेला होतात. तुम्ही आषाढी एकादशीला पंढरपूरला भेट दिली. तिथे पूजाही केली. मग आता मंदिर सुरू करू नये यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत का? तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का?, असा खोचक सवाल कोश्यारींनी उपस्थित केला आहे.
माझ्या हिंदुत्वाला प्रमाणपत्राची आवश्यकता नाही - मुख्यमंत्रीराज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रानेच उत्तर दिले आहे. 'आपण पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, 'मी अचानक धर्मनिरपेक्ष झालो का? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे धर्मनिरपेक्ष असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा धर्मनिरपेक्ष आहे, तो आपल्याला मान्य नाही का?,' असा सवाल मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विचारला आहे.