मुंबई : परवडणारी घरे बांधण्याचे आश्वासन देऊन वर्ष उलटले अजून एकाही घराची साधी वीटही रचली गेली नाही. नुसती एकमेकांकडे टोलवाटोलवी करून चालणार नाही, कोणत्याही परिस्थितीत येत्या वर्षभरात अडीच लाख घरे बांधून पूर्ण झालीच पाहिजेत, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, एसआरए विभाग आणि पालिकेत याविषयी कोणताही समन्वय नाही. प्रकरणांवर निर्णय होत नाहीत, काही प्रकरणांमध्ये १९० दिवसांत निर्णय घेणे अपेक्षित होते; मात्र तो निर्णय जवळपास ९० प्रकरणांमध्ये घेतला गेला नाही. ही अशी टोलवाटोलवी चालली तर भविष्यात हे कामच काढून घेतले जाईल, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. एसआरए अंतर्गत जे प्रकल्प आहेत त्यांनी रखडलेल्या प्रकल्पाची प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी सांगितले. बैठकीत गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी या प्रकल्पासंदर्भात सादरीकरण केले. या वेळी राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मिलिंद म्हैसकर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता आदि उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)प्रक्रिया पूर्ण कराएसआरए अंतर्गत जे प्रकल्प आहेत त्यांनी कालमर्यादा सांभाळून रखडलेल्या प्रकल्पाची प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी सांगितले.
गृहनिर्माण विभागावर मुख्यमंत्री नाराज
By admin | Published: December 04, 2015 1:04 AM