ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १ - महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवण्याचा घाट घातला असून याच्याशी राज्यातील सत्ताधा-यांना काही घेणे देणे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस दिल्लीत बसलेल्या अमित शहांच्या इशा-यावर चाललात असा आरोप मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. अमित शहांनी ऊठ म्हटले की ते उठतात, निघा म्हटले की ते निघतात अशा तिखट शब्दात राज ठाकरेंनी फडवणीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
रविवारी नाशिकमध्ये मनसेच्या वीज कामगार सेनेचे अधिवेशन होते. या अधिवेशनाच्या उद्घाटनसोहळ्यात राज ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उद्घाटनानंतरच्या भाषणात राज ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली. पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांपासून महाराष्ट्राला मुक्त करा असे नरेंद्र मोदी सांगायचे. आता तेच मोदी शऱद पवारांसोबत बसतात, त्यांचे कौतुक करतात याकडे लक्ष वेधत ठाकरेंनी भाजपाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. नाशिकमध्ये आम्ही राष्ट्रवादीचा बाहेरुन पाठिंबा घेतला होता त्यावेळी आमच्यावर टीका झाली अशी आठवणही त्यांनी करुन दिली. राज्यात उद्योगधंदे कायम राहावे यासाठी कामगार संघटनांनी विनाकारण संप करु नये व मालकांनाही त्रास देऊ नये असे आवाहन ठाकरेंनी केले.