ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - मुख्यमंत्री व राज्यपालांनी राजीनामा देऊ नका असे सांगितले होते, परंतु विदर्भाच्या भल्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे श्रीहरी अणेंनी लोकमतशी बोलताना सांगितले. विदर्भाप्रमाणेच मराठवाडाही स्वतंत्र व्हायला हवा असे सांगणाऱ्या महाधिवक्ता असलेल्या अणेंवर प्रचंड टीका झाली आणि शिवसेनेसह विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अखेर अणेंनी राजीनामा दिला असून आपली वक्तव्ये जनतेच्या भल्याचा विचार करणारीच असल्याचे ते म्हणाले आहेत.
महाधिवक्ता हा सरकारी वकिल नसून जनतेचा वकिल असतो असे सांगत सरकारी यंत्रणेपेक्षा जनतेचं भलं हे या पदावरील व्यक्तिने बघणे हे घटनात्मक कर्तव्य असल्याचे अणे म्हणाले. या दृष्टीने बघता माझी विदर्भाबाबतची भूमिका जुनी असून या मुद्यावरून विधानसभेचे अधिवेशन दोन आठवडे होऊ दिले गेले नाही यामुळे संस्थात्मक स्थैर्य राखले गेले नाही असे अणे म्हणाले.
मराठवाड्यासंदर्भातही मी माझी भूमिका विषद केली आहे. परंतु यावेळीही विरोधकांनी अधिवेशनाच्या कामात व्यत्यय आणल्याचे अणे म्हणाले. या विषयावर खरंतर सगळ्या आमदारांनी विस्तृत चर्चा करायला हवी व मराठवाड्याची समस्या कशी सोडवता येईल याचा विचार करायला हवा असे अणे यांनी म्हटले आहे.
मात्र, मी माजी भूमिका बदलण्याची शक्यता नाही, आणि विरोधक चर्चा न करता सभागृहाचे काम बंद पाडणार असे चित्र आहे. त्यामुळे जनतेच्या भल्याचा विचार करता मी महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिला असल्याचे अणे यांनी स्पष्ट केले आहे.