मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी लंडनमध्ये वादग्रस्त ललित मोदी यांची भेट घेतल्याप्रकरणी केलेल्या खुलाशावर मुख्यमंत्र्यांनी प्रथमदर्शनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे मारिया यांना राज्य सरकारकडून ‘क्लीन चिट’ मिळणार हे स्पष्ट झाले आहे. मारिया यांनी या भेटीबाबत केलेला खुलासा हा प्रथमदर्शनी समाधानकारक वाटतो. तथापि, काही मुद्दे विस्ताराने जाणून घेणे आवश्यक आहे. या विषयात अतिरिक्त मुख्य सचिवांना (गृह) लक्ष घालण्यास मी सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी टिष्ट्वटरवरून दिली. मारिया यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांना ललित मोदी भेटीबाबत सविस्तर खुलासा दिला होता. बक्षी यांनी तो काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोपविला होता. मुख्यमंत्र्यांच्या टिष्ट्वटनंतर या प्रकरणावर राज्य सरकारकडून पडदा टाकण्यात आल्याचे दिसते. ललित मोदी प्रकरणात केंद्रातील भाजपाचे काही बडे नेते अडचणीत आले आहेत. त्यांची भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि केंद्र सरकारनेही पाठराखण केली आहे. या पार्श्वभूमीवर, मारियांबाबत कठोर भूमिका राज्य शासन घेणार नाही, असे बोलले जात होते. (विशेष प्रतिनिधी)
राकेश मारिया यांच्या खुलाशावर मुख्यमंत्री समाधानी
By admin | Published: June 25, 2015 1:40 AM