Mukhyamantri Ladki Bahin Yojana ( Marathi News ) : "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या-टप्प्याने वाढवण्यात येईल," असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं बोलताना दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ आणि ‘राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, खा. डॉ. भागवत कराड, आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, उर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड उपस्थित होते. "लाडकी बहीण योजनेचे पंतप्रधानांकडून कौतुक"
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात सुरु करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. गरिबीची जाणीव असल्याने या सरकारने गोरगरीब महिलांच्या संसाराला मदत करण्यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेतून काही महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरु केले असून त्यामधून रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. या महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत, असेही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले आहे. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचे कार्य हे देशासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्य शासनाचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी तरतूद केली असून ही योजना बंद होणार नाही, उलट भविष्यात लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
कृषिपंपांसाठी शून्य वीज बिलामुळे शेतकऱ्यांना लाभ
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतीसाठी साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. जवळपास ४५ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला असून त्यांचे वीज बिल शून्य झाले आहे. युवकांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली. यामधून प्रशिक्षण काळात त्यांना सहा हजार ते दहा हजार रुपये विद्यावेतन दिले जात आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून यामधून उभा राहणाऱ्या उद्योगांमुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल. रोजगार निर्मिती होईल. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून वयोवृद्ध नागरिकांना विविध उपकरणे खरेदीसाठी तीन हजार रुपयेपर्यंत सहाय्य करण्यात येणार आहे.