मुंबई : कोल्हापूर येथील महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीत रस्त्यावरच्या संघटनांना आणून बसवल्याची टीका केली. मात्र, महाआघाडीतील ५६ संघटनामध्ये ८० टक्के संघटना दलित समाजाचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या आहेत. त्यामुळे ही टीका दलितांच्या व आंबेडकरवाद्यांच्या जिव्हारी लागली असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत माफी मागण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.
सचिन खरात म्हणाले की, देशात संविधान बदलण्याची भाषा खुलेआम होत आहे. भाजपा नेत्यांकडून दलित समाजाबाबत केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येणे ही काळाची गरज आहे. दलित व आंबेडकरवादी संघटनांचे मायबाप डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे सरकारने विसरता कामा नये. बाबासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय आणि जाहीर सभेत त्यांचा फोटो लावल्याशिवाय सत्ताधाऱ्यांनाही राजकारण करता येत नाही. म्हणूनच ५६ इंचाच्या छातीतील मनुवाद संपवण्यासाठी मागासलेल्या समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या ५६ संघटना महाआघाडीत सामील झाल्याची प्रतिक्रिया खरात यांनी व्यक्त केली आहे.