मुंबई : ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेप्रमुख राज ठाकरे आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्या बैठकीचा तपशील जाहीर करण्याची मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. कायदा तोडणे आणि धमक्या देणाऱ्या राज ठाकरेंवर कायद्याचा बडगा उगारण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करीत त्यांना वर्षा बंगल्यावर बोलावले ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे निरुपम म्हणाले. आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीतील सारे मुद्दे जनतेसमोर यायला हवेत. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीतील निर्णयांचा सविस्तर खुलासा करावा अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा निरुपम यांनी दिला. ऐ दिल है मुश्किलच्या प्रदर्शनासाठी निधी देण्याची अट टाकण्यात आली. मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंना देशभक्तीची किंमत ठरविण्याचा अधिकार कोणी दिला. अशा प्रकारच्या चर्चेतील मुख्यमंत्र्यांचा सहभाग ही लाजिरवाणी बाब असल्याचे निरुपम म्हणाले. आर्मी फंडाला ५ कोटी देण्याची अट टाकण्याचा अधिकार यांना कोणी दिला, असा प्रश्न करतानाचा लष्करानेही आम्हाला पैशांची गरज नसल्याचे सांगत झाल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केल्याचा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थीचा तपशील जाहीर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2016 2:37 AM