मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फतच होईल’, या वक्तव्याचा पुनर्विचार करण्याची मागणी बीडीडी भाडेकरू संघटनांच्या महासंघाने केली आहे. म्हाडामार्फत बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यास भाडेकरू संघटनांचा विरोध असून कोणताही निर्णय घेण्याआधी संघटनांसोबत चर्चा करण्याची मागणी महासंघाने सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.महासंघाचे नेते किरन माने म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात बीडीडी चाळींमधील सुमारे १५ संघटना एकवटल्या आहेत. कारण वर्षभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा पुढे आणला. पुनर्विकासाचा निर्णय घेण्यासाठी भाडेकरू संघटनांची बैठक घेऊन जनसुनावणी घेण्याचे आश्वासनही दिले होते. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी म्हाडा प्रशासनाने भाडेकरू संघटनांसोबत घेतलेल्या बैठकीत बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडा करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून संघटनांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.महासंघाचे नेते राजु वाघमारे म्हणाले की, म्हाडा किंवा नोडल एजन्सीला संघटनांचा विरोध असून मुख्यमंत्र्यांनी घोषणेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी सरकारने याआधी नेमलेल्या समित्यांनी रहिवाशांना स्वयंविकासाची संधी देण्याचे सुचविले आहे. त्यानुसार रहिवाशांच्या मनाविरोधात जाऊन मुख्यमंत्र्यांनी कोणताही निर्णय घेऊ नये. जर येत्या महिन्याभरात मुख्यमंत्र्यांनी संघटनांसोबत चर्चा न करता कोणताही निर्णय घेतलाच, तर सर्व बीडीडी चाळींतील लाखो रहिवाशी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.
मुख्यमंत्र्यांनी घोषणेचा पुनर्विचार करावा!
By admin | Published: January 19, 2016 4:03 AM