सोमवारी पावसाळी अधिवेशनातील चर्चेदरम्यान आमदार धनंजय मुंडे यांची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. “महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतो हे दुर्दैव असून, राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी 'एकनाथ'च राहावे, 'ऐकनाथ' होऊ नये,” अशी कोपरखळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली.
नगराध्यक्ष हे जनतेतून थेट निवडले जावेत या विधेयकावर चर्चा होत असताना विरोधकांकडून याचा विरोध करण्यात आला. मागील सरकारमध्ये नगरविकास मंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनीच निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडायचा निर्णय तत्कालीन मंत्रिमंडळात मांडून मंजूर केला होता. मात्र सत्ता बद्दलताच मुख्यमंत्र्यांनी स्वतःच घेतलेला निर्णय स्वतःच बदलला हे ऐकनाथ झाल्याचे लक्षण असल्याची मिश्किल टिप्पणी मुंडेंनी केली.
“आपण सर्व लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सोबतच्या नगरसेवक कार्यकर्त्यांना न्याय व संधी देण्यासाठी प्रयत्न करत असतो, अनेक नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे देखील आपल्याला नगराध्यक्ष होण्याची संधी देतील या अपेक्षेने पाहत आहेत. मात्र त्या नगरसेवकांच्या आशेवर मुख्यमंत्र्यांनी पाणी फिरवले आहे,” असेही ते म्हणाले.
यावेळची विधानसभा अत्यंत वेगळी असून सर्व पक्षांना मत दिलेल्या जनतेला आपापले पक्ष सत्तेत आल्याचा आनंद मिळतो आहे, अशीच परिस्थिती समजा नगर परिषद निवडणुकीत झाली तर पक्ष कोणता अन नगराध्यक्ष कोणाचा अशी विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते, अन त्याउपरही हा निर्णय घ्यायचाच असेल तर मग मुख्यमंत्र्यांची निवड देखील जनतेतून होऊन जाऊद्या, असेही ते म्हणाले.