"मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा...", अजित पवार गटाच्या नेत्याचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 05:02 PM2024-03-12T17:02:06+5:302024-03-12T17:05:13+5:30
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत जागा वाटपांवरून कलगीतुरा सुरू असल्याचे पाहायला मिळते. शिवसेनाएकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा कल्याण लोकसभेवर वेगळा निकाल लागू शकतो, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आव्हान देण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असा इशाराच त्यांनी दिला आहे. यावर आनंद परांजपे म्हणाले, काल शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीची प्रतिक्रिया अजित पवारांबद्दल दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं. अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे खूप सोपं आहे. तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निकाल कल्याण लोकसभेवर लागू शकतो, असे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.
ठाण्यातील तीनही लोकसभेवर कोण उमेदवार देतात त्यांचा प्रश्न आहे, पण आम्हाला विश्वास आहे तीनही जागांवर महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. महायुतीतील प्रत्येक पक्षाला लवकरच सन्मानपूर्वक जागा मिळणार असून राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार घड्याळ चिन्हावर लढतील. तसंच महायुतीचे उमेदवार ठाणे, कल्याण, भिवंडी मतदारसंघातून विक्रमी मतधिक्याने निवडून आले पाहिजे. मात्र, विजय शिवतारे वैयक्तिक अजेंडा जर चालवत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य ती समज दिली पाहिजे. महायुतीचे चांगले वातावरण राहावं, असं जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर, आपले वाचाळवीर विजय शिवतारेना समज द्यावी. आमच्या शक्तिस्थळवर आघात करत असतील तर स्वाभिमानी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कल्याण लोकसभेवर वेगळं चित्र निर्माण करू शकतात, असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला आहे.