मुंबई : विरोधी पक्षात असताना एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस ही राम-लक्ष्मण, धरम-वीरची जोडी होती. सत्तापक्षावर टीकास्र सोडताना नाथाभाऊंना नेहमीच ‘देवेंद्र’ हवा असायचा. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र, दोघांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. खडसेंविरुद्धच्या मोहिमेला फडणवीस यांचे बळ असल्याची चर्चा त्यातूनच होतेय. खडसे २०१० पासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्या वेळी सत्तापक्षावर डागण्यासाठीचा दारूगोळा त्यांना तयार करून देण्यात महत्त्वाची भूमिका फडणवीस यांचीच असायची. पुरावे, कागदपत्रे गोळा करण्यापासून आलेल्या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तासन्तास अभ्यास करून त्याचे व्यवस्थित टिपण ते खडसेंच्या हाती देत.खडसे बोलत असताना त्यांच्या अगदी मागे बसलेले फडणवीस त्यांना अधूनमधून काही कागदपत्रे पुरवित किंवा काही मुद्दे लिहिलेले कागद त्यांच्या हातात देत. अजित पवार, जयंत पाटील, आर.आर.पाटील हे राष्ट्रवादीचे तेव्हाचे मंत्री खडसेंच्या भाषणात एखादा संदर्भ चुकला की, ‘आज देवेंद्रने तुम्हाला नीट माहिती दिलेली दिसत नाही,’ असा चिमटाही काढत असत. १२३ आमदारांसह भाजपाची सत्ता आली, तेव्हा विरोधी पक्षनेते या नात्याने ‘सीएम इन पाइपलाइन’ असलेले खडसे यांना मुख्यमंत्रीपद खुणावू लागले. कालपर्यंत आपल्या मागे बसणाऱ्या फडणवीसांच्या मागे मुख्यमंत्रीपद चालून येत असल्याचे दिसल्यानंतर खडसे हे अस्वस्थ होणे सुरू झाले. फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडल्यानंतरही हे पद बहुजन समाजाला मिळायला हवे होते, असे म्हणत खडसेंनी विठुरायाच्या साक्षीने पंढरपुरात आपल्या भावनांना वाट करून दिली होती. बदल्या, काही धोरणात्मक निर्णयांवरून दोघांमधील मतभेद लपून राहिले नव्हते.
मुख्यमंत्री - खडसे संबंधांत तणाव
By admin | Published: June 05, 2016 12:32 AM