ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - फडणवीस सरकारच्या बाबतीत जे घडत आहे त्यावर अनेकांच्या भूवया उंचावत असून या सरकारने कोणत्या मुहूर्तावर शपथ घेतली हेच तपासून बघायला हवे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. फडणवीस सरकारचे कुठे काय चुकतेय यावर बसून बोलण्याची गरज आहे असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विमान उड्डाणासाठी विलंब केल्याच्या आरोपांवरुन चांगलेच अडचणीत आले आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला फटकारले आहे. फडणवीस सरकारच्या बाबतीत जे घडत आहे त्यावर अनेकांच्या भूवया उंचावत असून या सरकारने कोणत्या मुहूर्तावर शपथ घेतली हेच तपासून बघायला हवे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिवसेेनेशिवाय राज्य चालवू शकू अशी भाजपाची धारणा होती, पण शिवरायांना ते मान्य नसावे, आज मुख्यमंत्र्यांसह भाजपाने अन्य मंत्रीही वादाच्या भोव-यात अडकले आहेत याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री व त्यांच्या ७ ते ८ लोकांचे उत्सव मंडळ राज्यात व्यापार आणण्यासाठी अमेरिकेत गेले आहे, यासाठी फडणवीस सरकारला शुभेच्छा असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला.गेल्या १५ वर्षात राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या परदेशवारीत झालेल्या करारांपैकी किती डॉलर्स प्रत्यक्षात राज्यात आले याचाही तपास व्हायला हवा असे ठाकरे म्हणतात. डिजिटल इंडियात मुकेश अंबानी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात किती गुंतवणूक करणार, अगोदर सरकारने स्वदेशी उद्योगांचा राज्यातील पाया मजबूत करावा, मग परदेशी गुंतवणूकादारांकडे बघावे असा सल्लाही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या चमूतील एक वरिष्ठ अधिकारी व्हिसा विसरुन विमानतळावर आले त्याला मुख्यमंत्री काय करणार असा प्रश्नही ठाकरेंनी उपस्थित केला.