महाबळेश्वर - गेल्या महिनाभरापासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्ष नाट्यामध्ये अनेक नेत्यांची झोप उडाली होती. सत्तेच्या सारीपाटात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष होतं. मात्र अखेर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने भाजपावर मात करत राज्याची सत्ता हातात घेतली. मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती पदावर आली, शिवसेना पक्षप्रमुख जबाबदारी सांभाळत उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले.
मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांची प्रशासकीय धावपळ सुरु असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. बैठका, उद्धाटन अशा कार्यक्रमातून वेळ काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसाच्या महाबळेश्वर येथे खासगी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री महाबळेश्वर मुक्कामी असून राजभवन या शासकीय निवासस्थानी त्यांचा मुक्काम असणार आहे. वेण्णालेक पठारावर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरणार असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने प्रशासनानेही तयारी केली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी आणि १०० हून अधिक पोलीस कर्मचारी याठिकाणी दाखल झालेत. आमदार भास्कर जाधव यांच्या मुलीचा विवाह सभारंभ महाबळेश्वर येथील कीज रिसॉर्टमध्ये १ फेब्रुवारीला रोजी होणार आहे. या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाबळेश्वर दौऱ्यावर असल्याने प्रशासनाची धावपळ सुरु झाली असून पोलीस प्रशासन, पालिका, महसूल, बांधकाम विभागासह सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे. मुख्यमंत्री सहा आसनी हेलिकॉप्टरने येणार असल्याने या हेलिकॉप्टरचे पंख मोठे असतात. त्यामुळे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जागा शोधण्याची कसरत प्रशासनाला करावी लागली. वनविभागाकडून गेल्या अनेक वर्षापासून पोलो मैदानावर हेलिकॉप्टर उतरण्यास बंदी केल्याने जागेची मोठी अडचण झाली. बुधवारी सायंकाळी वेण्णालेक येथील पठारासह महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर असलेल्या वेलोसिटीमधीलही जागेची पाहणी करण्यात आली. अखेर वेण्णालेक पठारावर हेलिकॉप्टर उतरण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे आणि कुटुंब अनेकदा महाबळेश्वर दौऱ्यावर जात असतात. यापूर्वीही शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे उद्योगपती अविनाश भोसले यांच्या फोरऑक्स बंगल्यावर मुक्कामी असत. बाळासाहेब ठाकरे यांचेदेखील महाबळेश्वरवर विशेष प्रेम आहे.