मुंबई-
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झालेली असताना आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होत असताना कोरोनाच्या एन्ट्रीनं आता वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कमलनाथ यांनी राज्यातील काँग्रेस आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचे राज्यातील सर्व नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे सर्व आमदार आमच्याशी संपर्कात असून ४४ पैकी ४१ आमदार बैठकीला उपस्थित होते. तर तीन आमदार मुंबईच्या दिशेनं येत आहेत, अशी माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याच्या वृ्त्तालाही नाना पटोले यांनी पुष्टी दिली. उद्धव ठाकरेंची अँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, पण आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याची अधिकृत पुष्टी अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही.
उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.