भोकरदन - अनेकदा नेते आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी धावून जातात हे आपण ऐकलं आहे, याचं ताजं उदाहरण म्हणजे नुकतेच मुख्यमंत्री झालेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकाच्या मदतीला धावून गेले. भोकरदन येथील महेश पुरोहित गेल्या ३० वर्षापासून शिवसेना संघटनेचं काम करत आहे. पुरोहित यांच्या अडचणीच्या काळात राज्याचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी यांनी केलेल्या मदतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
महेश पुरोहित यांचे सासरे आजारी असल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत दीड लाख खर्च झाले असून अजूनही काही रक्कम त्यांच्या उपचारासाठी लागणार आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने महेश पुरोहित यांनी मुख्यमंत्र्यांकडे मदतीची याचना केली. पुरोहित यांनी उद्धव ठाकरेंच्या वैयक्तिक मोबाईलवर संदेश पाठवला. मुख्यमंत्रिपदाच्या कामाच्या धावपळीत उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद येईल की नाही याची शाश्वती त्यांना नव्हती. मात्र २४ तासांत यंत्रणा कामाला लागली अन् आजारी सासऱ्यांच्या उपचाराचा खर्च भागला.
पक्षाचं काम करता करता महेश पुरोहित अनेकदा मातोश्रीवर येत-जात असतं. त्यामुळे अनेक नेत्यांची त्यांचे संबंध चांगले होते. त्यांच्या सामाजिक कामाची दखल उद्धव ठाकरेंनीही घेतली होती. सासरे आजारी असताना आर्थिक अडचण निर्माण झाली. त्यावेळी पुढे काय करायचं या चिंतेत असलेल्या महेश पुरोहित यांनी थेट उद्धव ठाकरेंना मॅसेज पाठवला. हा मॅसेज ते पाहतील की नाही याची खात्री महेश पुरोहित यांना नव्हती. मात्र काही वेळानंतर पुरोहित यांच्या मोबाईलवर कॉल आला. बसच्या प्रवासात असल्याने त्यांनाही हा कॉल उचलता आला नाही. मात्र पुन्हा कॉल आल्यानंतर त्यांनी उचलला. त्यावेळी पलीकडून मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक सुधीर गायकवाड बोलतोय, मुख्यमंत्रीसाहेब बोलणार आहेत असं सांगितले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी पुरोहित यांना सांगितले आपण पाठवलेला मॅसेजची माहिती घेतली आपलं काम मार्गी लागेल असा दिलासा दिला.
मुख्यमंत्र्यांनी फोन ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आयुष्यमान भारतचे कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी पुरोहित यांना फोन करुन आवश्यक माहिती जमा केली. त्यानंतर काही काळात हॉस्पिटलच्या खर्चाची व्यवस्था झाली. या सर्व घडामोडीनंतर महेश पुरोहित यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत सामान्य शिवसैनिकांच्या हाकेला धावले अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली.