यवतमाळ : राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यवतमाळ जिल्ह्यातून विधान परिषद अथवा विधानसभा निवडणूक लढण्याची ऑफर शिवसेना नेते, माजी महसूल राज्यमंत्री आमदार संजय राठोड यांनी शुक्रवारी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. पुढील सहा महिन्यात त्यांना हे सदस्यत्व मिळविणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाचा शोध चालविला जात आहे. ते विधान परिषदेतून जाणार की विधानसभेतून हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु त्यांच्यासाठी दोन्ही पर्यायांचा विचार केला जात आहे.विधान परिषदेचा यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. प्रा. तानाजी सावंत येथून निवडून आले होते. परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रा. सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भुमपरांडा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहे. त्यामुळे यवतमाळची ही जागा रिक्त झाली असून, आणखी तीन वर्ष शिल्लक आहेत. या जागेसाठी आतापर्यंत प्रा. तानाजी यांचे ज्येष्ठ बंधू प्रा. शिवाजी सावंत यांच्या नावाची चर्चा होती. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनताच यवतमाळसाठी त्यांचे नाव चर्चेत आले आहे.उद्धव ठाकरे यांनी यवतमाळातून विधान परिषद किंवा सेनेसाठी सर्वात सुरक्षित मानल्या जाणा-या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी ऑफर दिग्रसचे आमदार संजय राठोड यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंना प्रत्यक्ष भेटून दिली. उद्धव ठाकरे यांनी विदर्भातून आणि त्यातही सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातून निवडणूक लढवावी अशी विनंती त्यांना केली गेली. राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळताना उद्धव ठाकरेंनी शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करावे याकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. विशेष असे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही दिग्रस विधानसभा मतदारसंघातून लढण्याची ऑफर संजय राठोड दिली होती. ------------मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज प्रत्यक्ष भेटून यवतमाळ जिल्ह्यातून विधान परिषद अथवा विधानसभा निवडणूक लढण्याची ऑफर दिली. त्यांनी माझे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. या ऑफरचा ते निश्चितच विचार करतील, अशी अपेक्षा आहे. - संजय राठोडआमदार, दिग्रस
Maharashtra CM: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यवतमाळातून निवडणूक लढण्याची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 6:21 PM