गरिबांना बुलेट ट्रेन नाही, तीन चाकी रिक्षाच परवडते; फडणवीसांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 12:10 PM2019-12-19T12:10:08+5:302019-12-19T12:35:20+5:30
महाविकासआघाडीचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगतीचं सरकार आहे.
नागपूर: नागपूरात आज (गुरुवारी) हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला. राज्यापालांच्या अभिभाषणात देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असलेले सरकार तीन चाकी रिक्षा सारखे असल्याचे सांगत महाविकासआघाला टोला लगावला होता. तसेच प्रत्येक कामाला स्थगिती देण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. 'स्थगिती सरकार' अशी प्रतिमा होणं धोकादायक असल्याचे सांगत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाला प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकासआघाडीचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगतीचं सरकार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या तीन चाकी रिक्षा सरकार असल्याच्या टीकेवर गरिबांना बुलेट ट्रेन नाही, तर तीन चाकी रिक्षाच परवडते असं सांगितले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील कोणत्याही कामाला स्थगिती देण्यात आली नसल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपाने सभागृहात आज देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी मदत जाहिर करण्याची मागणी केली होती. सभागृहात काही वेळ चाललेल्या आरोप- प्रत्यारोपनंतर भाजपाने सभात्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना बुधवारी देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेने चुका केल्या, तर त्याच्यामागे तत्वज्ञान उभं करण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका त्यांनी केली होती. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरुन फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला होता. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी मदत करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळावा. आश्वासनं स्वत:च्या भरवशावर द्यायची असतात आणि स्वत:च्याच भरवशावर पाळायची असतात, असा टोला फडणवीसांनी लगावला होता. ठाकरे सरकारचा उल्लेख 'स्थगिती सरकार' असा करत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.