औरंगाबाद - राज्यातील गोरगरीब जनेतेच्या दैनंदिन समस्या अनेक आहेत. घरे पेटवणं सोपं असतं पण गोरगरीबाच्या घरची चूल आधी पेटली पाहिजे, ते पेटवणं कठीण असतं अशा शब्दांत मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. औरंगबादमध्ये 'अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२०'चे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आताचं सरकार असं आहे की तुम्हाला तुमच्या पायावर खंबीरपणे उभं करणारं हे सरकार आहे. 'राज्यातील अनेक राजकीय अडचणींवर मात करुन हे सरकार स्थापन झालं आहे. हे शेतकऱ्यांचं सरकार असून मला राज्यातील शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करायचं आहे असं ते म्हणाले.
आज संपूर्ण देशाचं लक्ष वेधू शकेल असं हे प्रदर्शन आहे, केवळ मराठवाडा आणि महाराष्ट्र नाही तर देशातील उद्योजक इथे आलेले आहेत. आपल्याकडे जे कौशल्य आहे, जी बुद्धिमत्ता आहे, त्याचा योग्य वापर आपण करू शकलो तर संपूर्ण जगाची बाजारपेठ जिंकू शकू एवढी हिंमत, ताकद आणि कौशल्य माझ्या हिंदुस्थानात, माझ्या मराठवाड्यात नक्कीच आहे असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
तसेच बिडकिन येथे ५०० एकरवर आपण अन्नप्रक्रिया उद्योग केंद्र आपण उभारणार आहोत. आणि माझी इच्छा अशी आहे की जवळपास १०० एकर महिला उद्योजकांसाठी आरक्षित असली पाहिजे. शेंद्रा येथे माझ्या भूमिपुत्रांना शिकविण्यासाठी कौशल्य विकास संकुलसुद्धा हे सरकार उभारल्याशिवय राहणार नाही हे सुद्धा वचन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
दरम्यान, उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो, तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या आणि असं जर झालं तर मराठवाडा, महाराष्ट्र, संपूर्ण हिंदुस्थान जगातली महाशक्ती आहे आणि त्या महाशक्तीला शक्ति देण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही असंही त्यांनी सांगितले.
राज्यातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही: मुख्यमंत्री'कृषी आणि उद्योग यांची सांगड घालून राज्यात आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मंदी आली म्हणून रडत बसलो तर लढू शकणार नाही. महाराष्ट्राला रडण्याची नव्हे, तर लढण्याची परंपरा आहे', असंही मुख्यमंत्री म्हणाले.