मुंबई : राज्यावर 6.7 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा झाल्याने नव्याने आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील विकासकामांचा आढावा घेत आहेत.
राज्यातील विकासकामे थांबविण्यात येणार नाहीत, तर महत्वाच्या आणि आवश्यक असलेल्या विकासकामांना प्राधान्य देण्याची भुमिका ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाने घेतली होती. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प बुलेट ट्रेन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समृद्धी महामार्ग अडकण्याची चिन्हे होती.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदांना दिलेला निधी स्थगित केला आहे. नगर विकास खात्याने या पालिकांना दिलेला निधी थांबविण्यात आला असून यामध्ये केवळ सुरू न झालेल्या विकास कामांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच नवीन मंजूर कामांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात यावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.
तसेच ज्या कामांना कार्यारंभाचे आदेश देण्यात आले आहेत त्या कामांची यादी उद्यापर्यंत पाठविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्या साखर कारख्यानांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली 310 कोटी रुपयांची बँक हमी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने रद्द केली आहे.