पुणे : जम्बो हॉस्पिटलची खरोखरच गरज आहे का अशी विचारणा होत आहे. परंतु, जगात कोरोनाची एक लाट ओसरल्यावर दुसरी लाट आलेली आहे. ही दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वच जण प्रयत्न करीत आहेत. अशावेळी गाफील राहूनही चालणार नाही. त्यामुळे या जम्बो हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. आज या हॉस्पिटलचे उद्घाटन झाले असले तरी, या जम्बो हॉस्पिटलची गरज कोणत्याही रूग्णांना पडू नये, हे हॉस्पिटल आहे, तसेच रिकामी राहो. अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) च्यावतीने अठरा दिवसात शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३२ हजार चौरस मीटर मैदानावर १३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे जम्बो हॉस्पिटल उभारण्यात आले. या हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन झाला. यावेळी हॉस्पिटलच्या आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम, पीएमआरडीएचे सुहास दिवसे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, गेल्या अठरा दिवसात भर पावसात हे हॉस्पिटल उभे केले गेले याचा मोठा आनंद आहे. कोणत्याही वादळाला तोंड देईल असे हे जम्बो हॉस्पिटल आहे़ परंतु, या हॉस्पिटलमधील उभ्या केलेल्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडच्या सुविधांची गरज नागरिकांना पडू नये हीच आपली गणरायाकडे प्रार्थना आहे. कोरोनाच्या आपत्तीमुळे यंदा पंढरीची वारीही सुनी सुनी झाली. सर्व धर्मीय आपल्या उत्साहास बाजूला ठेऊन आपले सण साधेपणाने साजरे करीत आहे.
केंद्र शासनाने डिसेंबरपर्यंत कोरोनावरील लस येईल असे सांगितले असले तरी, पुढील चार महिने आपल्याला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. गणेशोत्सव, मोहरम, जैन बांधवांचे सण आदी सर्व सण सोबत आले असतानाच, पाऊस व कोविडची साथ यामुळे आपल्याला अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. लॉकडाऊनची बंधने कमी करताना गर्दी होणे हे अपरिहार्य आहे. अशावेळी नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे आदी खबरदारी घेणे महत्वाचे असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
आज हॉस्पिटल सुरू झाले म्हणजे लगेचच रूग्णांची अपेक्षा करू नका - अजित पवार शिवाजीनगर येथे रविवारी जम्बो हॉस्पिटलचे उद्घाटन झाले परंतु, अद्यापही तेथे एकही कोविडचा रूग्ण नाही असेही आता बोलले जाईल. पण रविवारी उद्घाटनानंतर या हॉस्पिटलमर्धील सर्व यंत्रणा, सामुग्री निर्जतुंकीकरण करण्यात येणार असून, यासाठी दोन दिवस लागतील. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मंगळवारनंतरच रूग्ण दाखल करण्यात येणार आहेत. असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करीत, हॉस्पिटल सुरू झाले पण अद्याप रूग्ण नाही या चर्चेच्या पूर्वीच पूर्णविराम दिला.