CM Uddhav Thackeray Live: राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच जाहीर केली आहे. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ३१ मेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात आता पुन्हा वाढ होणार की निर्बंध शिथिल केले जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज समाजमाध्यमांच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी संवाद साधणार आहेत. यात मुख्यमंत्री राज्यातील लॉकडाऊन संदर्भात पुढील माहिती देण्याची शक्यता आहे. (Chief Minister Uddhav Thackeray will address state at 8.30 pm tonight)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. त्यामुळे सध्याच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या क्षेत्राला दिलासा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. राज्यात लॉकडाऊनमध्ये वाढ केल्यास लॉकडाऊनचे नियम न पाळता दुकानं उघडू अशा इशारा याआधीच व्यापाऱ्यांनी दिला आहे. याशिवाय मुंबईत व्यापाऱ्यांच्या संघटनेनं भाजपच्या शिष्टमंडळासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन देखील दिलं आहे. त्यामुळे राज्यातील व्यापारी आणि छोट्या दुकानदारांबाबत सरकार कोणता निर्णय घेतंय याकडे लक्ष असणार आहे.
मुंबईची लोकल बंदच राहणार?राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचं दिसून येत असलं तर सध्या मुंबईच्या लोकलमध्ये सर्वसमान्य नागरिकांना असलेली प्रवास बंदी यापुढील काळातही कायम राहणार असल्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवासाची परवानगी आहे.