मुख्यमंत्र्यांचं 'मिशन पुणे', कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा अन् विरोधकांना देणार उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 02:12 PM2020-07-29T14:12:19+5:302020-07-29T14:15:01+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी सकाळी पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते कोरोना निर्मूलन आढावा बैठक घेणार आहेत.
मुंबई : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुण्याचा दौरा करणार आहेत. यावेळी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. दरम्यान, पुण्यात कोरोनाचा कहर सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः उत्तर देणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी सकाळी पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते कोरोना निर्मूलन आढावा बैठक घेणार आहेत. बैठकीत पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात कोरोना संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही माहिती घेतली जाईल. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री फक्त मुंबईतील परिस्थिती कशी नियंत्रणात आणली, याबद्दल पाठ थोपवून घेत आहेत अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. इतकेच नाही तर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार कोरोना परिस्थिती हाताळण्यात पुण्यामध्ये अपयशी ठरले हे दाखवण्याचा तर मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न नाही ना, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
याचबरोबर, राज्य सरकार पुण्यावर अन्याय करत असल्याची टीका भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कार्यकारिणी बैठकीत केली होती. राज्यातील सरकार मुंबईकडे जितके लक्ष देते तितके पुण्याकडे देत नाही. पुण्यावर अन्याय केला जात आहे. पुण्यात क्वारंटाईन सेंटर, आयसीयू बेड वाढवण्याची गरज आहे. मात्र, पुणे, पिंपरी पालिकेला एकाही नव्या पैशाचे अनुदान राज्य सरकारने दिलेले नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा उद्याचा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी मुख्यमंत्री विरोधकांना उत्तर देणार का, याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.
आणखी बातम्या...
'आता तरी किंमत सांगा...', राफेलवरून दिग्विजय सिंहांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
रियाने सुशांतच्या अकाऊंटमधून एका महिन्यात १५ कोटी काढले, वडिलांचा गंभीर आरोप
लडाखच्या पँगोंग-गोगरामध्ये अद्याप चीनची माघार नाही, फिंगर भागातही परिस्थिती जैसे थे...
"१५ दिवसांत ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होतील", मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ
राणेंवर बोलल्याशिवाय 'मातोश्री' बिस्कीट टाकत नाही असा समज, पण...; नितेश राणेंची बोचरी टीका
कोरोनापासून बचावासाठी डॉक्टरचा 'देसी जुगाड'; रुग्णांवर असा केला जातोय उपचार
अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी, प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापूंची घोषणा
राफेलच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळावर जय्यत तयारी, ३ किमीचा परिसर ड्रोन झोन घोषित