मुंबई : देशातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकताच झालेल्या व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली होती. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. (Chief Minister Uddhav Thackeray's demand to give covid vaccine to all people above 45 years of age was accepted by the Central Government)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे. विशेषतः ४५ वर्षांवरील तरूण वर्ग कामासाठी बाहेर असतो, त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये सांगितले होते. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे.
दरम्यान, सुरूवातीच्या टप्प्यातही महाराष्ट्र लसीकरणात देशात अव्वलस्थानी होता. आतापर्यंत (दि. २२ मार्चच्या आकडेवारीनुसार) राज्यात ४५ लाख ९१ हजार ४०१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. असे असले तरी महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढू लागला आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना १ एप्रिलपासून कोरोनावरील लसआज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार येत्या १ एप्रिलपासून देशातील ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. देशातील ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना १ एप्रिलपासून कोरोनावरील लस दिली जाईल. या लसीकरणासाठी ४५ वर्षांवरील नागरिकांनी आपल्या नावांची नोंदणी करावी, असे आवाहन प्रकाश जावडेकर यांनी यावेळी केले. तसेच भारताकडे कोरोनावरील लसीचे पुरेसे डोस आहेत. भारतात अनेक लसी चाचणीच्या टप्प्यात आहेत, असेही प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारने १ मार्चपासून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोनावरील लसीकरण सुरू केले होते. १ मार्चपासून देशातील ६० वर्षांवरील नागरिकांना आणि गंभीर समस्यांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती.
(४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना १ एप्रिलपासून मिळणार कोरोनावरील लस, केंद्र सरकारचा मोठा निर्णय )