मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार खाली खेचण्याचा इशारा दिलेला असताना आणि शिवसेना-भाजपाचे संबंध कमालीचे ताणले गेले असताना ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र येत आहेत.शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त फडणवीस आणि उद्धव यांच्या उपस्थितीत महापौर निवासात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. स्मृतिदिनाचे औचित्य साधून उद्धव ठाकरे हे शेतक-यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २ कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे यावेळी सुपूर्द करणार आहेत.
विशेष बसगाड्यांची सोय-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दादर (पश्चिम), शिवाजी पार्क स्मृतिस्थळादरम्यान १७ नोव्हेंबर रोजी विशेष बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्य आणि शहरातून कार्यकर्ते शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाला आदरांजली वाहण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी दादर स्थानक (पश्चिम), दादर हिंदू स्मशानभूमीदरम्यान शिवाजी पार्कमार्गे बसमार्ग क्रमांक फेरी-२वर विशेष बसगाड्या सकाळी ७ ते सायं. ७ वाजेपर्यंत सोडण्यात येतील. दादर स्थानक (पश्चिम), कबुतरखाना, वीर कोतवाल उद्यान (प्लाझा), राम गणेश गडकरी चौक, गोखले मार्ग (उत्तर), रानडे रोड, शिवाजी पार्क या मार्गावरून या बस धावतील.