नागपूर : यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी रासायनिक खताच्या फवा-याने शेतकरी मृत्युमुखी पडले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाकडे पाठ फिरविली आहे. ड्राय पोर्टच्या उद्घाटनाला त्यांना वर्धेला येणे जमते, मात्र यवतमाळला येऊन पीडितांची भेट घेण्याचे सौजन्य त्यांनी दाखविले नाही. मुंबईत बसून त्यांना विदर्भाची खडान्खडा माहिती असतानादेखील झालेल्या प्रकाराबाबत त्यांची उदासिनता हा उंटावरून शेळ्या हाकण्याचाच प्रकार असल्याची जहरी टीका गोंदिया-भंडारा येथील भाजपा खासदार नाना पटोले यांनी केली आहे. नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते.सुरुवातीला जेव्हा मृत्यूच्या घटना उघडकीस आल्या त्यावेळीच जर राज्य शासनाने पावले उचलली असती, तर पुढील नुकसान टाळता आले असते. मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे झालेले मृत्यू हे एकाप्रकारे हत्याकांडच आहे, असा आरोप पटोले यांनी लावला. मुख्यमंत्री संवेदनशील असल्याचा दावा सत्ताधारी करतात. मग शेतक-यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश त्यांना दिसला नाही का असा प्रश्न उपस्थित करत पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. घटना झाल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील नेत्यांची भेट घेऊन पीडित कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित होते. मात्र विदर्भातील माणूस मुंबईला गेला की तो बदलतो, असेदेखील पटोले म्हणाले.श्रेय लाटण्याचा असाही अट्टाहासदरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील २० शेतक-यांच्या मृत्यूची दखल घेत केंद्र शासनाच्या अखत्यारितील डिपार्टमेन्ट आॅफ प्लँट प्रोटेक्शनच्या चमूने सोमवारी तेथे भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी लिहिलेले पत्र व केंद्रीय कृषिमंत्र्यांशी घेतलेली भेट यामुळेच ही समिती येथे आली, असा दावा नाना पटोले यांनी केला. पटोले यांनी ५ आॅक्टोबर रोजी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. मात्र केवळ त्यांनी लिहिलेल्या पत्रामुळेच पथक येथे आले, हा त्यांचा दावा अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे.
मुख्यमंत्री उंटावरून शेळ्या हाकतात, नाना पटोले यांची जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 8:55 PM