मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारपासून दुष्काळग्रस्त मराठवाड्याची पाहणी करण्यासाठी तीन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात पाच जिल्ह्यांतील पीक परिस्थिती, चारा छावण्या, जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना भेटी देण्यासह शासकीय यंत्रणेकडून सुरू असलेल्या मदतीच्या उपाययोजनांची ते माहिती घेतील. १ सप्टेंबरला दुपारी लातूर जिल्ह्याची आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ, निलंगा आणि औसा तालुक्यातील गावांना भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर रात्री उस्मानाबाद येथे जिल्हा आढावा बैठक घेणार आहेत.बुधवारी मुख्यमंत्री उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम आणि परांडा या तालुक्यांतील पीक परिस्थितीची पाहणी करण्यासह चारा छावणी, वैरण विकास कार्यक्रम, जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या कामांचीही पाहणी करतील. तसेच या तालुक्यांतील काही जलप्रकल्पांनाही ते भेटी देणार आहेत. सायंकाळी उशिरा बीड येथे जिल्हा आढावा बैठकीत शासकीय पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री माहिती घेतील. गुरुवारी परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत, गंगाखेड, पालम आणि परभणी तालुक्यांत पाहणी करतील. दुपारी परभणी येथे जिल्हा आढावा बैठक होईल. (विशेष प्रतिनिधी)
मुख्यमंत्री आजपासून मराठवाडा दौऱ्यावर
By admin | Published: September 01, 2015 2:07 AM