मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २५ ते २९ सप्टेंबरपर्यंत परदेश दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या परदेश दौऱ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडाकडू टीका केली आहे. राज्यातील माता भगिनींची झोप उडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. हजारो अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या झेंड्याखाली एकवटले आहेत. तेथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संबोधीत करत आहेत. तिथे बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.
सरकारमध्ये असतानाही रस्त्यावर उतरलो आहे. सत्तेचे कौतुक नाही. हा आक्रोश कुपोषित बालकांचा असून पेटलेले आंदोलन भडकवायला आलेलो नाही तर आंदोलनाला ताकद द्यायला आलो आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे. तुमचा संप चिरडू देणार नाही. शिवसेना तुमच्या पाठिशी आहे. असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हंटलं. ४ रुपये ९२ पैशांत पोषण आहार कसा देता? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. बाहेरील राज्यांमध्ये ऑक्सिजनच्या अभावी बालकांचा मृत्यू होतो. इथे देशाच्या आधारस्तंभाने दम तोडला. हा शाप सरकारने लावून घेतला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उत्तर प्रदेशाता ऑक्सिजनच्या अभावामुळे बालकांच्या झालेल्या मृत्यूवरून सरकारवर टीका केली आहे.
अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर या दोन्ही बहिणींमध्ये भांडण लावण्याचे काम सरकार करत आहे . तसे होऊ देऊ नका. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका, अशी सरकारला विनंती करतो. लाडू द्यायचा की चिक्की हे मी सांगता. नाही. मात्र माता भगिनींच्या चुलीकडेही लक्ष द्या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सौभाग्य योजनेवरही टीका केली आहे. वीज जोडून सौभाग्य जपता येणार नाही, त्यासाठी माणसं जपा, असंही म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे.