मुंबई : राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला नवा आयाम देण्यासाठी ओरॅकल या जगप्रसिद्ध कंपनीसोबत महाराष्ट्राचा सामंजस्य करार होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. ‘ओरॅकल’च्या निमंत्रणावरून हा दौरा होत असून, ही जगप्रसिद्ध कंपनी प्रथमच एखाद्या राज्याशी सामंजस्य करार करीत आहे. ओरॅकलतर्फे आयोजित ओपन वर्ल्ड या प्रतिष्ठेच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांचे प्रमुख भाषण होणार आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परिषदेला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यात राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी अभियानात ओरॅकल कंपनी सहभागी होणार आहे. भविष्यातील गरजांचा विचार करून त्या अनुरूप सुविधा, यंत्रणा उभी करण्यात ही कंपनी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर आणि पिंपरी-चिंचवड या तीन महापालिकांसोबत कंपनी कार्य करणार आहे. तसेच राज्यातील स्मार्ट सिटी अभियानासाठी आवश्यक ‘सेंटर आॅफ एक्सलन्स’ची उभारणीही ओरॅकलतर्फे करण्यात येणार आहे. दोन दिवसांच्या या दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर जेरी ब्राऊन यांची भेट घेणार आहेत. तसेच अमेरिकेतील विविध प्रमुख कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. मेक इन महाराष्ट्रसाठी राज्य सरकारनेही हाती घेतलेल्या इज आॅफ डुईंग बिझनेस ही मोहीम आणि त्यातील विविध योजनांबाबत प्रमुख उद्योगांना अवगत करणार आहेत.
‘ओरॅकल’सोबतच्या करारासाठी मुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यावर
By admin | Published: September 19, 2016 5:37 AM