लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राला मजबुती देण्यासाठी राज्य शासन सर्वंकष प्रयत्न करीत आहे. राज्यात मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना राबविण्यात येणार असून, या योजनेंतर्गत एक हजार कृषीपंपांच्या गटाला पीपीपी तत्त्वार स्वतंत्र्य सौर वाहिनी निर्माण करून सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत दिवसाची १२ तास वीज उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. बुधवारी मालेगाव तालुक्यातील शिरपूर-खंडाळा येथील ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्राच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हा परिषद सदस्य शबानाबी मोहम्मद इमदाद, मालेगाव पंचायत समितीच्या सभापती मंगला गवई, शिरपूरच्या सरपंच सुनिता अंभोरे, राजू पाटील राजे, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अधीक्षक अभियंता विनोद बेथारीया, अनिल डोये, राकेश जनबंधू आदी उपस्थित होते.ना. बावनकुळे म्हणाले की, गेल्या दोन वर्षात विद्युत यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच राज्यातील ३ लाख १० हजार शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज जोडणी देण्यात आली आहे. याकरिता आतापर्यंत १२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कृषीपंपांना वीज जोडण्या देण्यासाठी नवीन ३ लाख अर्ज प्राप्त झाले असून याकरिता आणखी १२०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना वीज जोडणी बरोबरच वीज बचत करणारे कृषीपंप ५० टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे वीज बचतीबरोबरच शेतकऱ्यांचा खर्च कमी होण्यास मदत होईल. तसेच शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाचा लाभ मिळावा, याकरिता आणखी १० हजार सौर कृषीपंप मंजूर करण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा सक्षम करण्यासाठी १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील वीज विषयक बहुतांशी प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली.जिल्ह्यातील अतिभारीत झालेली वीज यंत्रणेची क्षमता वाढ करण्यासाठी विद्युत उपकेंद्र व रोहीत्रांची क्षमता वाढ करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या प्रलंबित वीज जोडण्या देता येणार आहेत. पैनगंगा बॅरेज परिसरातील कृषीपंपांना वीज जोडण्याचा प्रश्न महत्वाचा असून याकरिताही लवकरच निधी उपलब्ध करून देणार असल्याचे ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी सागितले.
राज्यात मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना राबविणार!
By admin | Published: May 18, 2017 2:06 AM