मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आज जनतेला संबोधित करताना राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा, पुन्हा लॉकडाऊन की वीज बिल सवलतीबाबत मोठी घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिवाळीनंतर देशासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तर मुंबईत सुद्धा कोरोनाचा आकडा वाढत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा लॉकडाऊनबाबत भाष्य करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, शाळा पुन्हा सुरु करणे, वाढीव वीजबिलावर सवलत यांसह अनेक विषयांवर बोलणार असल्याची चर्चा आहे. मात्र, उद्धव ठाकरे नेमकं कोणत्या विषयी बोलणार आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कोरोनाचा वाढता आकडा पाहता मुंबईतील सर्व शाळा मात्र 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर नागपूर, पुण्यात सुद्धी कोरोनाची परिस्थिती वाढत असल्यामुळे शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेनेही राज्यभरात सोमवारपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिलाच्या दरात सवलत देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्यभरात वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे वीज बिल सवलतीबद्दल काही घोषणा करतात का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.