नागपूरः मुख्यमंत्र्यांसोबत विविध विषयांवर चर्चा झाली. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय जाहीर करतील, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक संपन्न झाली, त्यानंतर जयंत पाटील माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. बैठकीत शेतकरी कर्जमाफीवर चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्याबचा अधिकार आहे. विरोधक आक्रमक कुठे आहेत? ते फक्त कांगावा करत आहेत, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर नवीन सरकारकडून शेतकरी कर्जमाफीबाबत हालचाली सुरू झाल्या असून, सहकार विभागाकडून यासाठी माहिती मागविण्यात येत आहे. यामध्ये कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरू शकतात, थकबाकीदार शेतक-यांची संख्या व इतर माहितीचा समावेश असून, त्यासाठी सहकार विभागाकडून ही माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू झाले.शेतकरी कर्जमाफीसाठी या पूर्वीच्या सरकारच्या काळात अगोदर राजकीय पक्षांचे आंदोलन व नंतर स्वत: शेतक-यांनीच सुरू केलेल्या आंदोलनानंतर तत्कालीन राज्य शासनाने दीड लाखांपर्यंतच्या थकबाकीला कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यातही आधी 2012 ते 2016पर्यंतचे थकबाकीदार शेतक-यांचा समावेश होता. नंतर त्यात सुधारणा करून 2009पर्यंतच्या थकबाकीदार शेतक-यांचा समावेश करण्यात आला. यासाठी जिल्ह्यातून वेगवेगळ्या याद्या मागविण्यात आल्या. सोबतच यामध्ये अनेक जाचक अटी असल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत आले. अद्यापही जिल्ह्यातील 40 ते 45 हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यात आता राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार सरकारकडून शेतकरी कर्जमाफीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील- जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 2:53 PM