ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ५ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत माता की जय बोलण्यावरुन केलेल्या वक्तव्यावरुन सोमवारी विधानसभेत पडसाद उमटले असताना आता मित्रपक्ष शिवसेनेही याप्रकरणी मुख्यमंत्र्याना चिमटे काढत भुमिकेत नरम पडल्याप्रकरणी टीका केली आहे. देशद्रोही घोषणा देणा-यांवर तुम्ही कारवाई केली नसेल तर भारतमाता की जयचे पोकळ नारे देण्याचा अधिकार तुम्हालाही नाही व तुम्हीही ओवेसीइतकेच गुन्हेगार आहात असे टीकास्त्र उद्धव यांनी सोडले.
'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव यांनी फडणवीस यांच्यासह आपली भूमिका मागे घेणा-या सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही निशाणा साधला आहे. ' जे भारतमाता की जय बोलणार नाहीत त्यांना महाराष्ट्रात व देशात राहण्याचा अधिकार नाही! अशी गर्जना करून आम्ही काही गुन्हा केला असेल तर मुख्यमंत्री महोदय, आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. ओवेसी सुटला तरी चालेल, पण देशप्रेमी तुरुंगात गेलेच पाहिजेत' असे त्यांनी अग्रलेखात म्हटले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच ठरते, पण ते आधी कठोर झाले व नंतर जास्त पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाले. भारतमाता की जय बोलणार नाहीत त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, असे तुम्हीच म्हणत आहात ना? मग अशी मस्तवाल भाषा करणा-यांना हाकलून द्या. ओवेसीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून येथे फरफटत आणून कसाबच्या कोठडीत ढकलण्याची हिंमत तुम्ही का दाखवली नाही? मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ही कारवाई केली नसेल तर भारतमाता की जयचे पोकळ नारे देण्याचा अधिकार तुम्हालाही नाही व तुम्हीही ओवेसीइतकेच गुन्हेगार आहात, अशी घणाघाती टीका उद्धव यांनी केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पद्धतीने सांगितले की, ‘भारतमाता की जय बोलावेच लागेल. जे भारतमाता की जय बोलणार नाहीत त्यांना हिंदुस्थानात राहाण्याचा अधिकार नाही!’ फडणवीस यांनी हे आधी जोरात सांगितले व नंतर भारतमातेच्या प्रश्नी ते नरम पडले. फडणवीस यांनी भारतमातेच्या प्रश्नी माघार घेण्याची गरज नव्हती, पण त्यांनी माघार घेतली व त्याचे खापर नेहमीप्रमाणे मीडियावर फोडले. हे असे का झाले याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनीच करायला हवा असं सांगता स्पष्टीकरण देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
‘भारतमाता की जय’ म्हणायला जे तयार नाहीत, जे उद्दामपणे त्याला नकार देत आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या वेळी हाच आक्रमकपणा कुठे गायब होतो असा प्रश्न विचारत अखंड महाराष्ट्रासाठी आंदोलन करणार्या नाशिकच्या शिवसैनिकांवर दरोड्याचे गुन्हे टाकून तुरुंगात पाठवले जाते आणि ओवेसीवर कारवाई केली जात नाही म्हणत शिवसैनिकावंरील कारवाईचा उद्धव ठाकरेंनी निषेध केला आहे. ज्या त्वेषाने महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणार्या फडतूस लोकांचे समर्थन केले जाते त्याच त्वेषात महाराष्ट्रात येऊन भारतमातेवर थुंकणार्यांवर कारवाई झाली असती तर तुमचे राष्ट्रप्रेम खरे! असल्याचं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना भेटा व हे सर्व ‘राष्ट्रीय’ उपक्रम मार्गी लावा! देशविरोधी फतवा काढणार्या देवबंदवाल्यांचे नरडे दाबा. भारतमातेचा अपमान करणार्या ओवेसीवर महाराष्ट्रात गुन्हा दाखल करा व जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबाबाईंना एकदा तरी भारतमाता की जय बोलायला लावा! वाटल्यास हे सर्व करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अणे वकिलांची नेमणूक करावी असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.