नागपूर - राज्यात ईडीचं सरकार आहे. महाविकास आघाडीची सभा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. भाजपाचा पर्दाफाश संभाजीनगर सभेने केला. नागपूरच्या सभेचा वादही कोर्टात गेला. भाजपा का घाबरते? चोर के दाढी मे तिनका, ही परिस्थिती आज भाजपाची झालीय. देशातील सर्वात महागडे शहर नागपूर आहे. कर्जाने आणलेला देखावा दिसतो. या शहरात जे आणले ते कर्जरुपाने आणले. लोकांचे खिसे कापले जातात. नागपूरकारांना लुटले जातेय अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
नाना पटोले म्हणाले की, अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अधिवेशनात सरकारने मदत करावी यासाठी आम्ही सातत्याने मागणी केली. राज्यात मुख्यमंत्र्यांचा कॉमेडी शो सुरू आहे. अजितदादा खूप हसतात. पण शेतकऱ्यांना एक पैसाची मदत केली नाही. २-३ दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतेय, राज्याच्या सरकारला देणेघेणे नाही. जाहिरातीवर १ हजार कोटी निधी प्रस्तावित केला आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यात धर्माधिकारी यांनी मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म आहे अशा शब्दात त्यांनी व्यासपीठावरूनच सत्ताधाऱ्यांचे कान टोचले. राज्यातील जनतेचा पैसा तुटलेल्या एसटीवर लावून कोट्यवधी रुपये जाहिरातीवर खर्च केले जात आहे. ९ कंपन्यांना शासकीय व्यवस्थेत काम दिले गेले. जनतेच्या कामाचा पैसा कर रुपाने घेतला जातो. पण त्याचा वापर प्रशासकीय वापरातून लोकांसाठी करणे गरजेचा आहे. पण आऊटसोर्सिंग करून तरुणांची फसवणूक केली जात आहे. कंत्राटदारांची व्यवस्था निर्माण केलीय असा आरोप नाना पटोले यांनी म्हटलं.
दरम्यान, कुणीही आत्महत्या करू नका, आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या लोकांना सत्तेतून बाहेर काढा. स्वयंस्फूर्तीने लोक महाविकास आघाडीच्या सभेला येतील. लोकांचा राग पाहायला मिळणार आहे. माध्यमांना मी रोज सांगत होतो. ते संजय राऊतांचे ऐकतात, आमचं ऐकत नाही. राज्यात जनता राजा आहे. सत्ताधारी राजा नाही. मतदानाच्या रुपाने सत्ताधाऱ्यांना जाग आणण्याचं काम जनतेने करावं. महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेला ताकदीने यावे. सगळ्यांच्या एकतेमुळे जागा जिंकत चाललोय. राहुल गांधींना कितीही घाबरवण्याचं काम झाले, सदस्य रद्द केले, बेघर केले या सर्व गोष्टीची चीड यायला पाहिजे.