विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील नदी शुद्धीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करणारी ध्वनिचित्रफीत ही शासनाने किंवा शासनाच्या कोणत्याही विभागाने तयार केलेली नाही. नदी शुद्धीकरण क्षेत्रात काम करणाºया रिव्हर मार्च या अशासकीय संस्थेने ती तयार केली आहे. त्याचा शासनाशी कोणताही संबंध नसल्याचे आज स्पष्ट करण्यात आले. या व्हीडिओवरून सध्या विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.मुंबईतील नद्या स्वच्छ करण्यासाठी ईशा फाऊंडेशन, रिव्हर मार्च अशा अनेक संघटनांनी गेल्या कित्येक वर्षांपासून कार्य प्रारंभ केले आहे. अशा अनेक संघटनांनी आपल्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे मांडल्या होत्या. या सर्व संघटनांची एक बैठक सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आणि त्यात नदी शुद्धीकरणासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. या अभियानाला आणखी गती देण्यासाठी आणि त्यादृष्टीने जनजागरण व्हावे, यासाठी एक ध्वनीचित्रफीत तयार करण्याचे रिव्हर मार्च या संस्थेने निश्चित केले. हे आवाहन मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीने संयुक्तपणे केल्यास ते अधिक परिणामकारक ठरेल, अशी विनंती रिव्हर मार्चच्या वतीने विक्रम चौगले यांनी केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याला सहमती दर्शविली.या चित्रफितीत राजकीय नेतृत्वासोबतच मुंबईसाठी काम करणारे महापालिका आयुक्त, मुंबईचे पोलिस आयुक्त इत्यादी वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांनासुद्धा त्यांनीच विनंती केली आणि या निसर्ग संवर्धनाच्या, समाजोपयोगी कामासाठी त्यांनी सहर्ष होकार दिला, असे शासनाच्या वतीने आज स्पष्ट करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हीडिओ नदी शुद्धीकरण प्रचारासाठी, सरकारचे स्पष्टीकारण: विरोधकांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 3:44 AM