ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताची माहिती बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सुद्धा अपघाताचा व्हिडिओ ट्विट करुन दिली.
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा गुरुवारी अपघात झाला. निलंग्याहून मुंबईकडे येत असताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत हेलिकॉप्टरमध्ये असलेले पाचही जण सुरक्षित आहेत. मात्र, मुख्यमंत्र्याच्या या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर सर्वसामान्यांपासून दिग्गजांपर्यंत सगळ्यांनीच मुख्यमंत्र्यांबद्दल काळजी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी फोनवरुन त्यांची विचारपूस केली. यातच ट्विटरवर नेहमीच अॅक्टिव असलेल्या अमिताभ बच्चन यांनी सुद्धा मुख्यमंत्र्याच्या अपघाताची माहिती ट्विट करुन दिली. त्या ट्विटसोबत त्यांनी अपघाताचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. निलंगा येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावरुन मुंबईच्या दिशेने उड्डाण भरत असताना अचानक हेलिकॉप्टर कोसळले.
T 2435 - Helicopter carrying CM Maharashtra, Shri Devendra Fadnavis, crashes .. all safe .. video of the crash !! A providential escape !! pic.twitter.com/nsUPrdNh8l— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 25, 2017
जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरुप - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातानंतर लगेचच ट्विटरच्या माध्यमातून आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली. मी आणि माझी टीम संपूर्णतः सुरक्षित आहे. कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही, असे ट्विट त्यांनी केले. तसेच यानंतर व्हिडीओच्या माध्यमातून "माझ्या पाठिशी महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद. काही काळजीचं कारण नाही, मी सुखरुप आहे", अशी प्रतिक्रियादेखील दिली.