लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी हेलिकॉप्टरच्या अपघातातून बचावल्यानंतर शुक्रवारी ते चार्टर विमानाने चिकलठाणा विमानतळावर आले आणि दहा मिनिटांनंतर ते हेलिकॉप्टरने अमरावतीकडे रवाना झाले. अपघाताच्या घटनेनंतरही दुसऱ्याच दिवशी त्यांनी हेलिकॉप्टरमधून प्रवास केला. १५ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये गडचिरोलीजवळ बिघाड झाला होता. विमानतळावर भाजपाचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, नगरसेवक कचरू घोडके आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. गुरुवारच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली होती. चार्टर विमानातून उतरून देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरच्या दिशेने निघाले. चार्टर विमान ते हेलिकॉप्टर, अशा दहा मिनिटांच्या अंतरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. दुपारी १.४० वाजता मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर आकाशात झेपावले.
मुख्यमंत्र्यांचा शुक्रवारीही हेलिकॉप्टरने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2017 2:51 AM