मुंबई – संभाजी भिडे (गुरुजी) यांच्या कार्यकर्त्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांच्याच जीवाला धोका असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. बेलगाम हिंदुत्ववादी संघटनांना वेळीच आवरले नाही तर त्यांचे दहशतवादी गटात रूपांतर होण्यास बेळ लागणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदनंतर पोलिसांकडून सुरू असलेले ‘कोंबिंग आॅपरेशन’ थांबविण्याची मागणी करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी भिडे गुरुजींवर पुन्हा एकदा निशाणा साधला. भिडे गुरुजींच्या एका समर्थकाने एक
जानेवारीच्या आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्री फडणवी, मंत्री गिरीष बापट आणि सुधींद्र कुलकर्णी यांची हत्येला प्रोत्साहन देणारे पोस्ट केले होते. रावसाहेब पाटील या तरूणाच्या फेसबुक पोस्टचे फोटोही प्रकाश आंबडेकर यांनी पत्रकार परिषदेत दाखविले. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या हिंदू संघटनांवर समाजाचे नियंत्रण आहे. मात्र, मिलिंद एकबोटे, भिडे गुरुजींच्या संघटनांवर कोणाचे बंधन नाही. आपला हेतू साध्य झाला नाही तर या संघटनांचे कार्यकते थेट हत्येची भाषा करतात. त्यामुळे अशा संघटना प्रोत्साहन न देता वेळीच त्यांना आवरण घालण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्य्यमंत्री फडणवीस यांना जीवे मारण्याबाबत तसेच कोरेगाव हिंसाचार प्रकरणासंदर्भात विविध पोस्ट सोशल मिडीयात झळकत असतानाही पोलिसांनी ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहचवली नाही. त्यामुळे पुणे शहर पोलिस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त , पुणे ग्रामीणचे अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक आणि गुप्तवार्ता विभाग प्रमुखांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
महाराष्ट्र बंदनंतर आतापर्यंत तीन हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत १२५ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यात १६ वर्षाखालील १६ मुलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानंतरही पोलिसांनी कोंबिंग आॅपरेशन थांबविले नाही. कोंबिंग आॅपरेशन ही लष्करी कारवाई आहे. कायद्यानुसार नागरी भागात अशा प्रकारची कारवाई करता येत नाही. याबाबत न्यायालयात दाद मागणार असून अशा आॅपरेशनसंदर्भात नियमावली तयार करण्याचा आग्रह धरणार असल्याचेही आंबडेकर यांनी स्पष्ट केले.
कोरेगाव-भीमा हिंसाचाराविरोधात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदनंतर पोलिसांनी दलित तरुणांची धरपकड सुरू केली आहे. हे अटकसत्र पोलिसांनी थांबवावे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. याबाबत त्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी कोम्बिंग आॅपरेशन थांबविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आंबेडकर यांनी भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली होती.
कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी दलित आणि डाव्या संघटनांनी बुधवारी राज्यव्यापी बंद पुकारला होता. या संघटनांच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. आंबेडकर यांच्यासह विवेक कुलकर्णी आणि महेंद्र सिंग आदी नेते होते. शिष्टमंडळाने केलेल्या सर्व प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दलित आणि डाव्या संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनात दलितांबरोबर इतर विविध समाजातील लोकांचाही सहभाग होता.
बंदनंतर मुंबई आणि औरंगाबादमध्ये सुरू असलेले ‘कोम्बिंग आॅपरेशन’ थांबवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. कोरेगाव-भीमा घटनेला जबाबदार असणाºयांना अटक करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. या घटनेच्या चौकशीसाठी न्यायाधीशांची नियुक्ती करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींशी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे. मुख्य न्यायाधीशांकडून न्यायमूर्तींच्या नावांचे पॅनेल देण्यात येणार आहे. चौकशी समितीसाठी त्यातील नाव निवडण्यात येणार आहे. हिंसाचाराची चौकशी करणाºया न्यायाधीशांनाच चौकशीत जे दोषी असतील त्यांना शिक्षा सुनावण्याचा अधिकार देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे नक्षलवाद्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता हा आरोप चुकीचा आहे. नक्षलवाद्यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याचा दावा राजकीय असल्याचे आंबेडकर म्हणाले.