मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आपल्या चीन दौऱ्यात बीजिंग येथे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांसमवेत बैठका घेतल्या. त्या वेळी महाराष्ट्रात गुंतवणूक वाढविण्यासह विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. त्याला कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.तैयुआन प्रोजेक्ट (टीझेड) ही कंपनी महाराष्ट्रात क्रेनचे उत्पादन करणार आहे. या कंपनीने पुणे आणि नागपूर येथे २०० कोटींचा प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवली आहे. भूमी अधिग्रहण, कारखान्यांचे बांधकाम व उत्पादनासंबंधी इतर सोयीसुविधा या वर्षी तयार करून पुढील वर्षापासून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल.याप इंडिया आॅटोमोटिव्ह सिस्टिम प्रा.लि.चे संचालक हुआझू चेन आणि बोओडी सचिव झू ली यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याप ही इंधन टाकी बनवणारी सर्वांत मोठी कंपनी असून, आॅटोप्लास्टिक फ्यूएल टँक क्षेत्रातील संशोधन आणि उत्पादन या क्षेत्रात विशेषत्वाने ही कंपनी कार्यरत आहे. मुंबई येथील झूम डेव्हलपर्स प्रा.लि. आणि याप यांच्या संयुक्त भागीदारीने २०१०मध्ये चेन्नई येथे या कंपनीने आपले उत्पादन सुरू केले आहे. बँक आॅफ चायना लवकरच मुंबईमध्ये आपली शाखा सुरू करणार आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान चायना बँकेचे अध्यक्ष टियान ग्योली यांनी ही माहिती दिली. या वेळी महाव्यवस्थापक जिओ झाओगंग आणि मुंबई शाखा प्रस्तावित ग्रुपचे प्रमुख कियो हेंगचांग उपस्थित होते. सॅनी ग्रुपचे अध्यक्ष वेनबो झियांग आणि विपणन संचालक ऐरोन गावो यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सॅनी ही महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या पहिल्या प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचा पुणे येथे प्रकल्प असून, तो अधिक कार्यक्षम करण्याचा त्यांचा मानस आहे. ग्रेट वॉल मोटर्स कंपनी लि. ही चीनमधील एसयूव्ही आणि पिक-अप वाहनांमधील सर्वांत मोठी कंपनी आहे. देशाच्या वाहन क्षेत्रातील ३८ टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते, असे लक्षात घेऊन या कंपनीने पुणे येथे चिनी कंपन्यांसाठी विशेष औद्योगिक पार्क तयार करण्यात स्वारस्य दाखविले आहे.सीजीजीसी आणि सोमा कन्स्ट्रक्शन ही कंपनी संयुक्त भागीदारीतून आंध्र प्रदेश येथील ७१७ लक्ष अमेरिकन डॉलर एवढ्या गुंतवणुकीचे जलसिंचन प्रकल्प राबवित आहे. दक्षिण-उत्तर कॉरिडॉर महामार्ग आणि पूर्व-पश्चिम कॉरिडॉर महामार्ग प्रकल्पांमध्ये ही कंपनी सहभागी आहे. यातील सीजीजीसी कंपनीचे उपाध्यक्ष एलव्ही झेजिआंग यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.चायना मशिनरी कॉर्पोेरेशनचे उपाध्यक्ष ली जिंगकाई आणि महाव्यवस्थापक लिमीन, चायना एक्सडी कंपनीचे उपमहाव्यवस्थापक जिनामिंग आणि परराष्ट्र व्यापार विभागाचे उपसंचालक जेफरी ली, चायना रोड अॅण्ड ब्रिज कॉर्पोरेशनचे उपमुख्य अर्थतज्ज्ञ ज्यू ताईझू, चायना हार्बर इंजिनीअरिंग कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष शी यिंगताओ आदींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
उद्योगवृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठका
By admin | Published: May 17, 2015 1:53 AM