यदु जोशी, मुंबईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले असून या अभियानाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.पावसाचे पाणी शिवारातच अडविणे, विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे आणि दुष्काळी भागातील भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे. या मिशनसंदर्भात पहिली बैठक ५ डिसेंबरला सह्णाद्री अतिथीगृहावर होणार असून त्यास अण्णा हजारे उपस्थित राहणार आहेत. तीन दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी हजारे यांच्याशी चर्चा केली. लोकोपयोगी आणि राज्य हिताच्या बाबींसाठी सहकार्यही देऊ, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. राज्यात गेल्या काही वर्षांत सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी दूरगामी उपाययोजनांवर २० टक्के तर मदत आणि पुनर्वसनावर तब्बल ८० टक्के निधी खर्च होतो. दुष्काळी मदत ही तात्पुरती मलमपट्टी असते. ही परिस्थिती नेमकी उलटी करून दूरगामी योजनांवर ८० टक्के तर अपरिहार्यता म्हणून मदतीवर २० टक्के निधी खर्च व्हावा आणि पुढे पुढे तो आणखी कमी व्हावा या संकल्पनेतून जलयुक्त शिवार अभियान राबविले जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे मिशन जलयुक्त शिवार
By admin | Published: December 04, 2014 2:37 AM