ऑनलाइन लोकमत -
रायबंदर ग्रामस्थांसह सामाजिक, आरटीआय कार्यकर्त्यांचा विजय
पणजी, दि. 23 - चोडण अभयारण्याच्या जवळ ठेवलेले कॅसिनो जुगाराचे जहाज तथा फ्लोटेल तिथून हटविले जावे, असा आदेश मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अखेर शनिवारी बंदर कप्तान खात्याला दिला. या आदेशामुळे रायबंदरवासीयांनी या कॅसिनो जहाजाविरुद्ध घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा विजय झाला.
कॅसिनो जुगारासाठी असलेले फ्लोटेल हे भलेमोठे जहाज तथा तरंगते हॉटेल डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याजवळ ठेवल्यामुळे मच्छीमारांना अडथळा होत होता. शिवाय अभयारण्यासाठीही ते हिताचे नव्हते. वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी सर्वप्रथम याविरुद्ध अतिशय स्पष्ट भूमिका घेऊन ते जहाज अभयारण्याजवळून अन्यत्र हटवा, अशी सूचना बंदर कप्तान खात्याला केली होती. तथापि, खात्याने विविध क्लुप्त्या लढवून ते फ्लोटेल तिथेच ठेवले होते. त्यामुळे रायबंदरच्या ग्रामस्थांनी व आरटीआय कार्यकर्त्यांनी मिळून या कॅसिनो जहाजाविरुद्ध राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतल्यानंतर लवादाने सरकारच्या पर्यावरण खात्यास नोटीस बजावली होती.
सोमवारी विधानसभा अधिवेशन सुरू होत असून सोमवारी रायबंदर बंद पुकारू, असे आमदार पांडुरंग मडकईकर, सामाजिक कार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्स व ग्रामस्थांनी मिळून जाहीर केले होते. यामुळे सरकारला स्वत:च्या भूमिकेवर फेरविचार करावा लागला.