मुंबई : मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतरही मराठा क्रांती ठोक मोर्चाने इतर प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मराठा आरक्षण कोर्टात नक्की टिकेल, कारण आरक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ढकलली.
उद्धव ठाकरे म्हणाले, आंदोलनातील हुतात्मा कार्यकर्त्यांची जाणीव ठेवून आंदोलकांनी उपोषण सुरूच ठेवल्याचे समजले. त्यामुळे उद्धव यांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलकांची भेट घेतली. ज्या कार्यकर्त्यांनी हौतात्म्य पत्करत आरक्षण मिळवून दिले, त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व शासकीय नोकरी मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल. तसेच आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांची धरपकड थांबवत गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन उद्धव यांनी उपोषणकर्त्यांना दिले. आरक्षण हे सरकारने दिलेले नसून ते समाजाने मिळवले असल्याचेही उद्धव यांनी नमूद केले.शिवसेना पक्षप्रमुखांच्या आश्वासनानंतर उपोषण मागेशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेत असल्याची घोषणा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक नानासाहेब जावळे-पाटील यांनी केली. उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागण्या मान्य करून घेण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण सोडत असल्याचेही जावळे-पाटील यांनी स्पष्ट केले.