- यदु जोशी, मुंबई
गृहनिर्माण धोरणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ घेत पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना एकत्रितपणे लढतील या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले. २०१२ मधील निवडणुकीत २२७ पैकी शिवसेनेने सर्वाधिक ७५ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस ५२, भाजपा ३१, मनसे २८, राष्ट्रवादी काँग्रेस १३ आणि इतर २८ असे संख्याबळ त्यावेळी होते. त्यानंतर २०१४ मध्ये झालेली लोकसभा निवडणूक भाजपा-शिवसेना एकत्रितपणे लढले मात्र, विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढले आणि युतीची सत्ता आली. देशासाठी आणि राज्यासाठी मुंबई महापालिका युतीच्या हाती राहणे अत्यावश्यक असल्याची जाणीव उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनादेखील आहे. राज्य मंत्रिमंडळाचा गाडा हाकताना मुख्यमंत्र्यांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. सरकार चालविताना शिवसेनेचे चांगले सहकार्य हवे असेल तर शिवसेनेसाठी नाजूक विषय असलेल्या मुंबई महापालिकेत त्यांच्याविरुद्ध शड्डू ठोकणे राजकीय शहाणपणाचे होणार नाही, हे मुख्यमंत्री जाणतात. सरकारच्या यशाचे श्रेय जसे मुख्यमंत्र्यांना मिळते तसे अपयशाचे श्रेयदेखील त्यांचेच. अशावेळी उद्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आणि तो अंगलट आला तर त्याचे खापरही मुख्यमंत्र्यांवर फुटेल. त्याऐवजी सन्मानाने युती करण्यावरच मुख्यमंत्र्यांचा भर असेल असे राजकीय जाणकारांना वाटते. भाजपाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा युतीबाबतचा आदेशही महत्त्वाचा असेल. शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सडकून टीका सातत्याने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, युतीला भाजपा श्रेष्ठी हिरवा झेंडा दाखवतील का, या बाबत साशंकता आहे. तथापि, तशी परिस्थिती उद्भवल्यास मुख्यमंत्री कौशल्य पणाला लावतील, असेही मानले जाते. मुंबईतील भाजपाच्या काही नेत्यांना स्वबळावर लढण्याची खुमखुमी आहे. मात्र, तसे झाल्यास भाजपाला सत्तेजवळ आणण्याची कुवत त्यांच्यापैकी कोणामध्येही नाही. आज मुंबईसाठीचे गृहनिर्माण धोरण जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकीचे गणित समोर ठेवूनच उद्धव ठाकरे यांची सोबत घेतली. या धोरणाला अंतिम स्वरुप देण्यापूर्वी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना मातोश्रीवर मान्यतेसाठी पाठविले होते. गृहनिर्माण धोरणाचे श्रेय मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसोबत वाटून घेतले. सेनेला एकटे पाडण्यासाठी प्रसंगी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेणे म्हणजे २५ वर्षांपासूनच्या मित्राला (शिवसेना) दूर लोटणे असेल. ही जोखीम राज यांच्यासाठी घेण्याइतपत त्यांची मुंबईत ताकद नाही. शिवाय त्यांना सोबत घेतल्याने हिंदी भाषिक मतदार आमच्यापासून दुरावेल, असे मत भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केले.सरकारमध्ये भाजपा-शिवसेनेत समन्वयाचा अभाव होता. अलिकडे उद्धव ठाकरे, सेनेचे मंत्री आणि प्रतोदांसोबत बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी नाराजी दूर करण्याचा ठोस प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर दर तीन महिन्यांनी समन्वयाची अशी बैठक घेण्याचे ठरविले. ही देखील युतीसाठीची मुख्यमंत्र्यांची साखरपेरणी असल्याचे बोलले जाते. - राज्यात एकत्रितपणे सत्तेत राहायचे आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत मात्र एकमेकांवर वाट्टेल तसे आरोप करायचे असे चित्र युतीसाठी योग्य नाही, असा भाजपा आणि शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांचा सूर आहे. त्यामुळेच मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुकीला युती म्हणून सामोरे जावे, असा विचार प्रबळ होताना दिसत असून खुद्द मुख्यमंत्रीच त्या भूमिकेचे असल्याचेही म्हटले जाते.- मुंबई महापालिकेत भाजपा-शिवसेना एकमेकांविरुद्ध उभे ठाकले तर त्याचा परिणाम इतर महापालिका आणि त्याच सुमारास असलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकींवरदेखील होईल.