ठाणे : ठाण्यात वेगवेगळे नेते नवरात्रोत्सव साजरा करत असताना, तेथे भक्तांची भाऊगर्दी उसळलेली असतनाही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक मानले जाणारे शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांच्याच देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावल्याने शिवसेनेतील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या एकाच देवीवर श्रद्धा जडल्याने भाजपाची कुजबूज ब्रिगेडही कामाला लागली आहे.ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचा राजीनामा देताना राणे यांनी शिवसेनेतील २७ आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. भाजपा नेत्यांनीही शिवसेनेचा मोठा गट फुटेल, असा दावा करत दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचा पाठिंबा काढला, तरी सरकारच्या स्थैर्याला काही धोका नाही, अशी माहिती पुरवण्यास सुरूवात केली. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुद्दाम येऊन फाटक यांच्या देवीचे दर्शन घेतल्याने भाजपाने गळ टाकल्याची चर्चा रंगली आहे. फडणवीस यांनी ठाण्यातील अन्य कोणत्याही देवीचे दर्शन घेतले नाही.ज्यावेळी राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा फाटक हे राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये दाखल झाले. तेव्हांपासून फाटक यांच्यावर कट्टर राणेसमर्थक असा शिक्का होता.फाटक यांचे मंडळ वागळे इस्टेट येथे आहे. शिवसेनेत येण्यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना फायक यांनी विद्यमान मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांना शिवसेनेत घेऊन विधान परिषदेवर पाठवून शिंदे यांनी सुरक्षित खेळी केल्याचे मानले जात होते. त्यातून फाटक आमदार झाले. शिवाय शिवसेनेने वर्षानुवर्षे डावखरे यांच्या नात्यात सांभाळलेला वसंतोत्सवही संपुष्टात आला. शिंदे यांची कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील ताकद वाढली. तेथे त्यांना आव्हान देईल, असा स्पर्धक उरला नाही. पण फाटक यांचा संपर्क पाहून त्यांना बळ देत ठाण्यातील शिवसेनेच्या या हुकमी एक्क्याला सुरूंग लावण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे तर्क लढवले जाऊ लागले आहेत.भाजपाचे आमदार रवी राणा यांनी एकीकडे शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू होईल आणि दुसरीकडे शिवसेनेचे आमदार ‘वर्षा’ बंगल्यावर भाजपामध्ये प्रवेश करतील, असे वक्तव्य केले आहे.मुंबईत भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते अनिल परब यांचा दांडिया खणाखणी करत असतानाच फडणवीस मात्र फाटक यांच्या नवरात्रोत्सवाला आवर्जून उपस्थित राहिले आणि नंतर फाटक मुख्यमंत्र्यासोबत फाटक मुलुंडमध्ये भाजपाच्या नवरात्रोत्सवात दिसून आले. त्यामुळे भाजपाने राणेंप्रमाणे अन्य नेत्यांसाठीही फाटक उघडले आहे का? अशी चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.इतर मंत्र्याप्रमाणे मी मुख्यमंत्र्यांनाही नवरात्रोत्सवाचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार ते माझ्याकडे आले. त्यानंतर ते ठाण्यात कुठे गेले याची मला कल्पना नाही. - रवींद्र फाटक, आमदार, शिवसेना
फाटकांच्याच देवीवर मुख्यमंत्र्यांची श्रद्धा, राणे समर्थक असल्याने सेनेतही तर्कवितर्कांना उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:14 AM