ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - विदर्भाला महाराष्ट्रापासून तोडणे म्हणजे आईपासून मुलाला वेगळे करण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांची 'विदर्भ एक्सप्रेस' विकासाच्या वाटेवर जाणे गरजेचे असून ती स्वतंत्र विदर्भावर घसरु नये असा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
सोमवारी नागपूरमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भाविषयी योग्य वेळी निर्णय घेऊ असे म्हटले होेते. यावरुन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. विदर्भातील मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणे म्हणजे राज्याच्या रखवालदाराने 'घोटाळा' केल्यासारखे असल्याचा खोचक टोला ठाकरेंनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्तविषय टाळून विदर्भाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे सांगितले पाहिजे होते. मुख्यमंत्री स्वतः व सुधीर मुनगंटीवार हे दोघेही विदर्भातील असल्याने आता या दोघांनी पुढाकार घेऊन विदर्भाचे मागासलेपण दूर करावे असे आवाहनही त्यांनी केले. तसेच अखंड महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०५ वीरांचे स्वप्न साकार व्हावे यासाठीच नव्या मुख्यमंत्र्यांनी शर्थ करावी असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.