मनसे सोडत लोकसभेला वंचितमध्ये उमेदवारीसाठी आलेल्या पुण्याचे वसंत मोरे यांनी शिवबंधन बांधणार असल्याचे जाहीर केले आहे. मातोश्रीवर जाऊन ते येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी मोरे यांनी वंचितच्या लोकांनी, मतदारांनी आपल्याला स्वीकारले नसल्याचे कारण सांगितले होते. आता त्याला प्रकाश आंबेडकर यांचे प्रत्यूत्तर आले आहे.
वसंत मोरेंचे राजकारण आयाराम-गयारामांप्रमाणे आहे. त्यांना माणसे ओळखता येत नाहीत. त्यांच्याकडून सातत्याने अशा गोष्टी घडत आहेत, अशी टीका आंबेडकर यांनी केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच शिंदेंसोबत झालेल्या चर्चेचा तपशीलही त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये मुख्य तीन मुद्दे होते, जमीनीवरील शेतीसाठी केले अतिक्रमण, गावामध्ये स्वतंत्र घरे बांधली आहेत त्याला अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा आल्या आहेत. तसेच दीक्षाभूमी आंदोलन प्रकरण या मुद्द्यांवर चर्चा झाली. ज्यांनी शेतीसाठी अतिक्रमण केले आहे त्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही, ती पिकं त्यांनाच मिळतील असा निर्णय त्याठिकाणी घेण्यात आला असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
गावामधील घरे आहेत पण ती अतिक्रमीत आहेत असे दाखवण्यात आले आहे. त्यांना उठवले जाणार नाही. नोटीस बजावल्या जाणार नाहीत. त्यासंदर्भातील नवीन धोरण शासन लवकरच जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. याचबरोबर दीक्षाभूमी प्रकरणात ज्या कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या आहेत त्या सर्व केसेसवर कोणतीही पुढची प्रक्रिया होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत, असेही आंबेडकर म्हणाले.