NCP Jayant Patil ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात काही दिवसांपूर्वी रंगलेल्या कलगीतुऱ्यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाव न घेता आमदार रोहित पवार यांना टोला लगावला आहे. मला किंगमेकर व सेनापती म्हटलेले 'त्यांनाही' आवडेल, असा टोला जयंत पाटील यांनी रोहित पवार यांना लगावला. छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी भवनात ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास संबोधित केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत होते. पक्षाच्या शिबिरात 'किंगमेकर' व सेनापती अशी विशेषणे जयंत पाटील यांच्याबाबत वापरल्यानंतर रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.
"मुख्यमंत्री कोण बनणार, कोण नाही हा विषय महत्त्वाचा न करता एकदिलाने लढून महाविकास आघाडीला यश मिळवून देणे, हेच आमचे ध्येय आहे. जागा वाटपाच्या निमित्तानेही फार ओढाताण करायची नाही. तर सक्षमता हा निकष ठेवून त्या सरळ सोप्या पद्धतीने करण्यावर आमचा भर राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस निष्ठावंतांना आणि नव्या चेहऱ्यांना संधी देऊ इच्छिते," असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. अजितदादा पवार गटाचे कोण येणार, किती येणार हे आताच सांगणे शक्य नाही. परंतु नव्या कार्यकर्त्यांचा ओढा शरद पवार यांच्याकडे वाढलेला आहे, असे सांगत, आ. सतीश चव्हाण आमच्याकडे येण्याबद्दल कोणताही प्रस्ताव नाही, असंही ते म्हणाले. सांगलीसारखा तिढा विधानसभेच्या वेळी राहणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. पुण्यात जे चाललेय, ते सरकारचे अपयश असल्याचा आरोप करीत पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रालाच ड्रग्जचा विळखा पडला असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
दरम्यान, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आ. संजय वाघचौरे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन आदींची उपस्थिती होती.
"सत्ताधाऱ्यांचा आता 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न"
"सत्ताधारी आता 'डॅमेज कंट्रोल' करण्यासाठी अर्थसंकल्पात आकर्षक घोषणा करतील. पण त्या घोषणा हवेत विरून जातील. मग सरकार बदलेल. आमचे सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल. विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्ह गोठवले जावे, ही निवडणूक आयोगाकडे आग्रही मागणी आहे. या चिन्हामुळे लोकसभेत आमचे दोन जागांचे नुकसान झाले," असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.