सांगली : दर्जेदार, गुणत्तापूर्ण शिक्षण आणि तळागाळापर्यंत पोहोचलेली आरोग्यसेवा याबाबतीत सांगली जिल्ह्याने आदर्शाची गुढी उभारली आहे. सांगलीचा आदर्श संपूर्ण राज्याने घेतला असून त्याचे अनुकरण सर्व जिल्ह्यांत केले जावे असे आदेश शासनाने बुधवारी (दि. २६) काढले. सांगलीतील मॉडेल स्कूल व स्मार्ट पीएचसी योजना सर्व जिल्ह्यांनी राबवाव्यात असे आदेश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.सांगलीने राबविलेला "आदर्श शाळा आणि स्मार्ट पीएचसी विकास" हा उपक्रम शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात आदर्श ठरला आहे. मॉडेल स्कूल योजनेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक कायापालट झाला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभागही घेण्यात आला आहे. स्मार्ट पीएचसी उपक्रमामुळे आरोग्य केंद्रे स्मार्ट झाली आहेत. बहुतांश प्राथमिक आरोग्य सुविधा गावाताच उपलब्ध झाल्याने शहरी रुग्णालयांवरील ताण कमी झाला आहे.तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही योजना प्रभावीरित्या राबवण्यात आल्या. ३१३ शाळांमध्ये मॉडेल स्कूल उपक्रम राबवण्यात आला तर ६४ प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट झाली आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगलीच्या मॉडेल स्कूल आणि स्मार्ट पीएचसी योजना राज्यभरात राबविण्याची घोषणा गतवर्षी अधिवेशनात केली होती. त्यानंतर सध्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मॉडेल स्कूल उपक्रमाची माहिती सांगलीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडून घेतली. त्यानंतर ही योजना राज्यभरात राबवण्याची घोषणा केली. या दोन्ही योजना राज्यभरात राबवण्यासाठीचा आदेश बुधवारी जारी करण्यात आला.
असा आहे मॉडेल स्कूल प्रकल्पमॉडेल स्कूलमध्ये पायाभूत सुविधांचा विकास, नवीन अध्यापन पद्धतींचा अवलंब, माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग, स्थानिक लोकसहभाग आदीचा समावेश आहे. स्मार्ट पीएचसी प्रकल्पात प्रत्येक आरोग्य केंद्रात पायाभूत सुविधा, चांगल्या आरोग्यसेवा आदीचा समावेश आहे.